Motivational Inspirational Article for Police Bharti

अपयशाचे खरे कारण ( पोलीस भरती : FIGHTER)

(Last Updated On: August 2, 2020)
4,095 Views

मागच्या 5 वर्षापासून तयारी करत आहेस अजून भरती कसा झाला नाहीस?  हा प्रश्न भरतीची तयारी करणा-या भावी पोलिसांच्या ग्रुप मध्ये जाऊन विचारला आणि अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला.

“ ठाण्याचा पेपरच त्या वर्षी कठीण होता “

“ फक्त दुपारी फिजिकल व्हायला नको होते…. मेरीट मध्येच आलो होतो पण आपले नशीबच खराब. नेमके दुपारी फिजिकल झाले.”

“त्याचे ऐकायला नको होते, म्हणत होतो पुण्याला उतरू… गेला मुंबईला घेऊन .. लागले लेखीचे मेरीट जास्त, बसलो घरी..”

“ह्या वर्षी वाचले दुसरे, आले दुसरे. अमुक लेखकाच्या पुस्तकातील सर्व प्रश्न पडले होते, पण मी तमुक लेखकाचे पुस्तक वाचत बसलो होतो.”

फक्त इथेच थांबत नाही ह्या प्रतिक्रिया.खात्रीशीर प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगवेगळी आहे. अजून वेळ दिला असता तर ‘ मी का भरती झालो नाही ह्याचे 1001 कारणे ‘ हे पुस्तक लिहून पूर्ण होईल. वरील सर्व प्रतिक्रियांना कारणे म्हणणे कदाचित तुम्हाला खटकत असेल. पण जर हे असे का घडले , मी का भरती होऊ शकलो नाही ? ह्याचा जर विचार केला तर नक्कीच आज तुमच्या अंगावर वर्दी नसण्यामागे हीच कारणे आहेत हे तुम्ही पटवून देउ शकता.


पण जर अजून थोडे पुढे जाऊन विचार केला तर तुमच्या लक्ष्यात एक गोष्ट येते का हे तुम्ही एकदा बघायला हवे.
वरील सर्व कारणांमध्ये ज्यांनी तुम्हाला भरती होण्यापासून रोकले त्या मध्ये एक गोष्ट आहे. आणि ती सर्वांमध्ये सारखीच आहे.
समजा, तुमच्या प्रत्येकाचे कारण वाचू आणि दोषी कोण हे ठरवू ! असा विचार करा कि तुम्ही भरती होत नाही ह्या मागे दोष कुणाचा आहे? वरील चार उदाहरण मध्ये-

क्रमांक 1: दोषी तर प्रश्नपत्रिका काढणारा असायला हवा. कारण तुम्ही ठाण्याला भरती साठी गेला आणि प्रश्नपत्रिका कठीण निघाली.

क्रमांक 2 :एकतर उन्हाळा ह्या ऋतु चा दोष आहे किंवा तो माणूस तुमच्या वाईटावर आहे ज्याला दुपारी फिजिकल घेण्याची कल्पना आली असेल.

क्रमांक 3 : तुमचा जवळचा मित्र , ज्याच्या सोबत तुम्ही मागचे कित्येक वर्ष तयारी केली. त्याने तुमचे नुकसान केले. तो दोषी आहे.

क्रमांक 4 : पुस्तक लिहिणा-या लेखकाचा दोष आहे किंवा ज्याने तुम्हाला हे पुस्तक वाच असे सांगितले त्याचा दोष आहे.

वरील सर्व दोषींवर कारवाई करायला हवी, आता जरी अंगात वर्दी नसेल म्हणून कारवाई करता येत नसेल तर, कमीत कमी ह्या वरील सर्व दोषी लोकांपासून तुम्ही दूर राहायला हवे.
जमेल का इतके?


तुम्ही भरती होऊ शकले नाहीत आणि का होऊ शकले नाहीत ह्या मागे असणारे दोषी तुम्ही शोधून काढले आहेत आणि निश्चय केला आहे कि ह्या लोकांना तुम्ही आयुष्यातून वगळणार आहात. कारण तुमच्या अपयशामागे हे लोक आहेत.
पण- अश्या किती लोकांना तुम्ही दूर ठेवणार? तुम्ही भरती होऊ शकले नाही म्हणून अजून कोणाकोणाला दोषी ठरवणार. आणि जर तुम्ही तुमचे वयोमर्यादा संपेपर्यंत जरी ही कारणे आणि ह्या कारणामागे असणारे दोषी लोक शोधत बसले तरी तुमची लिस्ट संपणार नाही.
वरील सर्व दोषी लोक आणि कारणे- ह्या सर्वामध्ये एक गोष्ट सारखी आहे असे ह्या आधी मी बोललो होतो. काय असेल ह्या सर्व कारणामध्ये समान?
तुम्ही!
तुम्ही दिलेली कारणे आणि दोषी ठरवलेली लोक ह्या सर्वामध्ये तुम्ही कुठेच नाही.
हो हे तुमचेच अपयश आहे पण तुम्ही मात्र कुठेच नाहीये. !! हे शक्य आहे का ? जी गोष्ट आपल्या बाबतीत घडते आणि त्यात आपण कुठेच नसू हे बुद्धीला पटणारे वाटत नाही.


आपण अपयशी होतो…. पुन्हा प्रयत्न करतो.
पुन्हा अपयशी होतो.. पुन्हा लढतो..
पण आपल्या अपयशाचे खरे कारण काय आहे ?

ह्या उलट जर तुमचा एखादा मित्र पोलीस भरती परीक्षेत यशस्वी झालेला असेल तर त्याचा यशाचे रहस्य त्याला विचारा. तो काय सांगतो ते बघा.

 • मी दोन वर्षापासून तयारी करत होतो.
 • खूप अभ्यास करावा लागला मला, तेव्हा कुठे पास झालो, खूप जबरदस्त स्पर्धा आहे आता.
  -मी ठरवले होतेच.. होईन तर पोलिसच होईन.

वरील प्रत्येक वाक्यावर विचार केला तर लक्ष्यात येते कि हो मी मेहनत केली, मी निश्चय केला होता , मी यशस्वी झालो.
वरील प्रमाणे अपयशाचे कारणे देणारे किंवा यशाची गाथा सांगणारे दोन्ही लोक चूक किंवा बरोबर नाहीत. आपण अगदी आपल्या मानसशास्त्र नुसारच वागतो.
माणसाचा हा स्वभावच आहे जिथे माणूस नकारात्मक गोष्टी साठी दुस-याना आणि सकारात्मक बाबींसाठी स्वतःला पुढे करतो.
पण इथेच खरी जादू आहे. चांगल्या गोष्टीचे श्रेय नक्कीच आपण घ्यायला हवे कारण ते आपल्या एका विशिष्ट वागण्याचे फळ असते.
लवकर यश मिळवणारे लोक मात्र अपयशाचे श्रेय देखील स्वतःकडे ठेवतात.
दुस-याच्या माथी खापर फोडण्याइतके सोपे आणि आनंदायी काम दुसरे कोणते नसावे.
पण असे करत असताना आपला काही फायदा होणार आहे का ह्याचा विचार एकदा करायला हवा.
आपल्या अपयशाचे खापर दुस-याचा डोक्यावर फोडण्यामागे आपलीच खूप मोठी फसवणूक होत असते आणि ह्या फसवणुकीचे अजून एक विशेष बाब म्हणजे आपली फसवणूक होत आहे हेच लवकर समजत नाही. आपण इतरांना दोषी समजत असतो आणि खरा गुन्हेगार बाजूला राहून पुन्हा तोच तोच गुन्हा करत राहतो.
जो पर्यंत खरा गुन्हेगार जेरबंद होत नाही तोपर्यंत तो गुन्हा होतचं राहणार. आणि आपल्या ह्या केस मध्ये आपले गुन्हेगार आपण आहोत. खरे दोषी आपण आहोत.
खूप फिरूनही आपण का यशस्वी होत नाही ह्याचे कारण शोधायचे असेल तर शेवटचा उपाय म्हणून आरश्यासमोर माणसाने उभे राहावे. त्याला कदाचित कारण मिळणार नाही पण त्याच्या अपयशाला जबाबदार असणरी व्यक्ती बघायला मिळेल. तिच्या कडे बघून ‘ तू कारणीभूत आहेस माझ्या पराभवाला ‘ हे म्हणा. आरसा तुम्हाला दाखवेल खरे कोण जवाबदार आहे. ‘तू हरवले मला ‘ असे म्हणून बघा – आरसा तुम्हाला ‘ हरणारा आणि हरवणारा’ दोन्ही पण दाखवेल.
आयुष्यभर जरी माणूस त्याचा खराब परिस्थितीचे कारणे शोधत बसला आणि त्या त्या कारणामागे असणारी व्यक्ती शोधत बसला तरी त्याचे हे काम थांबणार नाही. कारण तो ज्याला शोधतोय तो मुळातच त्याचा समोर आरश्याशिवाय कधीच येणार नाही.
माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट घटनांना मी स्वतः जबाबदार आहे हे आपण एकदा समजून घ्यायला हवे.

परीक्षा नक्कीच कठीण असेल ठाणे जिल्ह्याची. पण म्हणून बाकी मुले पण तिथे भरती झाले नसतील असे नाहीये. कठीण पेपर काढणारा जर तुमचा गुन्हेगार असेल तर ज्यांना पेपर सोपा गेला असेल , ज्यांचे मेरीट लिस्ट मध्ये नाव असेल त्यांच्या साठी तो नोकरी देणारा देवदूत असायला हवा. एकच व्यक्ती- पेपर काढणारा- जो काही उमेदवारांना चांगला आणि वाईट कसा असू शकेल?
फिजिकल टेस्ट सकाळी होऊ अथवा दुपारी, भरती होणारे उमेदवार तर भरती होतचं आहे. आपण मागे का?
जोपर्यंत आपण, आपल्या अपयशामागे आपण स्वतः आहे हे मान्य करत नाही तो पर्यंत आपण यशाच्या दिशेने पाऊले उचलू शकत नाही.
तुम्ही तुमच्या यशाचे शिल्पकार नक्कीच असाल पण त्या आधी अपयशाची शिक्षा भोगणारे तुम्ही स्वतः असायला हवे.

एकदा आपण आपल्या अपयशाचे धनी आहोत हे मान्य केले तर यश किती जवळ आणि किती सोपे आहे हे वाचण्यासाठी ह्या मालिकेतील पुढचे आर्टिकल नक्की वाचा.

मित्रांनो मी लिहितोय म्हणून नाही पण तुम्हाला स्वतः ला असे वाटते का कि ह्या मागे तुम्ही भरती न होण्यासाठी तुम्ही स्वतःच जबाबदार आहात? आपल्या अपयशाला आपणच जबाबदार आहोत ह्या बद्दल तुमचे काय मत आहे? तुमचे मत खालील कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा.

18 thoughts on “अपयशाचे खरे कारण ( पोलीस भरती : FIGHTER)”

 1. विशाल निंबाळकर

  Sir नक्कीच आपल्या अपयशाला आपणच जबाबदार असतो.

 2. पंकज ओव्हाळ

  आईला फोन करून मला हे सांगायचंय आई “मी भरती झालो बघ”! . माझी आई स्वप्न पाहिल आणि मी ते पूर्ण करणार नाही? माझा जन्मच आईच्या स्वप्नांसाठी झालाय..

  1. पंकज sir,
   तुम्ही लिहिलेले वाक्य – “आईला फोन करून मला हे सांगायचंय आई “मी भरती झालो बघ”! . माझी आईने स्वप्न पाहिल आणि मी ते पूर्ण करणार नाही? माझा जन्मच आईच्या स्वप्नांसाठी झालाय..”
   खरंच खूप प्रेरणादायी आहे. अशी वाक्ये वाचून, खरंच खूप वेळा अपयशी होऊन पण नव्याने लढण्याची प्रेरणा मिळते.
   हे स्वप्न लवकरच पूर्ण होवो. शुभेच्छा.

 3. बरोबर ,
  आहे सर,
  खरंच माणसाने आपले अपयश मान्य केले पाहिजे त्या अपयशातून यशाचे शिखर गाठले पाहिजे..

 4. सर तुमचा लेख खूप छान आहे .सर मी तीन वेळा पोलीस भरती दिली होती याचे करण मी खूप करणे सांगत असत मजा ग्राउंड निघत नाही कारण मी सराव कमी करत होतो पेपर अवघड आहे असे विविध करणे मी माझे मित्रांना सांगत .तुमचं हा लेख पाहून माजा आत्मविश्वास खूप वाढला आहे .मी चांगल अभ्यास करून ये भरती होण्यासाठी प्रयत्न करीन येचेत. स्वतःची चूक असते

  1. Prabhakar Sir,
   ह्या आर्टिकल मुळे तुमचा आत्मविश्वास वाढला हे या लेखाचे यश आहे. खरंतर आज पोलीस भरती साठी असणारी स्पर्धा बघता ह्या भरती प्रक्रियेला ‘ वर्दिसाठी लढाई ‘ म्हणता येईल. तीन वेळा ही लढाई लढूनही पुन्हा नव्या उमेदीने लढायला तयार असणे हे खऱ्या योध्याचे लक्षण आहे.
   येणाऱ्या भरती प्रक्रियेत यशप्राप्ती साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…!
   जय हिंद.

 5. हा.भरती जवल आली की हा पेपर दाखवणार तो माझ्या पुढे आहे मला टेन्शन नाय आणि वर्षी नो वर्षी रवःता अभ्यास करून रवःता चांगले मार्क्स काढणार इतका आत्मविश्वास असुन देखील दुसर्‍या वर अवलंबून राहचे

  1. मनोज sir,
   हे अगदी खरे आहे की दुसऱ्यावर अवलंबून राहून आपण अंतिम निवड यादी मध्ये येऊ शकत नाही. पूर्वी स्पर्धा कमी असल्यामुळे मेरिट अतिशय असायचे, ह्यावेळी आपल्या जवळच्या उमेदवाराने आपल्याला थोडी जरी मदत केली तरी अंतिम निवड यादीत आपले नाव असण्याला संधी होती.
   परंतु आता अधिक स्पर्धा, वेळेचा अभाव आणि कमी जागा यामुळे कितीही जवळचा मित्र उमेदवार आपल्याला मदत करणार नाही. आणि कोणी असेल आश्वासन देत असेल तरीही विश्वास ठेवायला नको कारण
   ह्या मुळे आपला भरती होण्याचा प्रयत्न अयशस्वी होऊ शकतो.

 6. राहुल पवार

  हो सर मागच्या भरतीत माझ्या बाबतीत पण असेच झाले होते. मित्र म्हणत होते हे पुस्तक बेस्ट आहे पण प्रत्यक्षात त्या बाहेरचे खूप प्रश्न आले होते. म्हणून दुसऱ्या पुस्तकांचा जास्त अभ्यास केला नव्हता.

 7. खूप छान माहिती आहे sir
  दुसऱ्याला दोष देऊन आपण भरती होऊ शकत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!